धाराशिव : प्रतिनिधी
एका २४ वर्षीय इसमावर तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास या गुन्ह्यात अटक न करता त्याचे गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलिस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षकाने त्यास १ लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी १७ जानेवारी रोजी ५० हजार रूपये स्विकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहाय्यक पोलिस निरीक्षकास अटक केली.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून सूरज शांतीलाल देवकर (वय ३५, रा. बाळे ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) हे कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर पोलिस स्टेशन तामलवाडी येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सूरज देवकर यांच्या अधिपत्याखालील पोलिस अंमलदार यांच्याकडे आहे. सदर तपास अधिकारी यांना सांगून नमूद तक्रारदार यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष १ लाख रूपये लाचेची मागणी केली. दरम्यान, १७ जानेवारी रोजी यातील पहिला हप्ता ५० हजार रूपये स्विकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम आज रोजी सापळा कारवाईदरम्यान पंचासमक्ष आलोसे यांनी स्वत: स्विकारली असता सूरज देवकर यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक, लाच प्रतिबंधक विभाग धाराशिव युनिट नानासाहेब कदम यांच्या पथकाने केली. पथकामध्ये सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उपअधीक्षक, लाप्रवि धाराशिव सिद्धाराम म्हेत्रे, अपर पोलिस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजीनगर मुकूंद आघाव, पोलिस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, आशिष पाटील, विशाल डोके, शशिकांत हजारे यांचा समावेश होता.
दरम्यान, लाच प्रतिबंधक विभागाने नागरिकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचा-यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.