33.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरबीडच्या लाचखोर महिला उपजिल्हाधिका-यास बेड्या

बीडच्या लाचखोर महिला उपजिल्हाधिका-यास बेड्या

बीड : तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी १० हजार रूपयांची लाच मागितली. हीच लाच एका निवृत्त मंडळ अधिका-यामार्फत स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली. सलग दुस-या दिवशी महसूल विभागात दोन कारवाया झाल्याने खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे गावातीलच तलावात गेले होते. त्याचा ५ लाख ३८ हजार ९६५ रूपये एवढा मावेजा मिळावा, यासाठी भूसंपादन विभागाकडे अर्ज केला होता. परंतू उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी हा अर्ज निकाली काढण्यास टाळाटाळ केली. शिवाय १० हजार रूपयांची लाचही मागितली. यावर पाच दिवसांपूर्वी संबंधिताने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने गुरूवारी दुपारी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. सागरे यांनीच वसूलीसाठी नेमलेला सेवा निवृत्त मंडळा अधिकारी नवनाथ प्रभाकर सरवदे (रा.अंबाजोगाई) याच्याकडे लाच देण्यास सांगितले. लाचेची रक्कम स्विकारताच एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, प्र. अपर पोलिस अधीक्षक राजीव तळेकर, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड, सहायक सापळा अधिकारी अमोल धस, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, भारत गारदे, अंबादास पुरी, स्रेहलकुमार कोरडे, सत्यनारायण खेत्रे आदींनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR