37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरकुठं चुकतय माहीत नाही; पण आम्हाला चिंता पाल्यांची 

कुठं चुकतय माहीत नाही; पण आम्हाला चिंता पाल्यांची 

लातूर : प्रतिनिधी
सरकारचे शैक्षणिक धोरण चुकीचे आहे की, ‘नामांकीत’चा तोरा मिरवणा-या शिक्षण संस्थांतील शिक्षणाची पद्धत चुकीची आहे माहित नाही, पण केवळ नामांकीत शाळा, महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला म्हणून समाधानी राहात येत नाही हे मात्र खरं. कारण कुठ तरी चुकतय आणि त्याचा थेट परिणाम पाल्यांच्या भवितव्यावर होतो. हे होऊ नये म्हणुनच खाजगी शिकवणीकडे वळावले लागत आहे, अशी भावना खाजगी शिकवणीचा अधिकचा आर्थिक भार सोसणा-या पालकांनी व्यक्त केली आहे.
आपल्या पाल्यास दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे ही प्रत्येक पालकांची ईच्छा असते. ही ईच्छा नामांकीत शाळा, महाविद्यालयांत प्रवेश घेऊनही पूर्ण होणे धुसर दिसत असेल तर एकच मार्ग तो म्हणजे खाजगी शिकवणी. विशेषत: खाजगी शिकवण्यांनी त्यांचा दर्जा व गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे खाजगी शिकवणी पालकांना अपरिहार्य वाटते, असे सध्याचे चित्र आहे. इयता दहावीनंतर चांगल्या विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना आपल्या पाल्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात. केवळ फिस भरुन प्रवेश मिळेलच याची खात्री नसल्यामुळे त्यांना अनेकांचे उंबरठे झिजवावे लागतात. बारावीनंतर मेडिकल, इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा व इंजिनीअरिंगनंतर जीआरर्स/जीमॅट, परदेशात एम. एस. एट्रन्स व त्यानंतर इंटर/ फायनलच्या अवघड परीक्षा असतात. एमबीए/लॉच्या प्रवेश परीक्षा चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी भरमसाठ गुण आवश्यक असतात. चांगल्या संस्थेत शिक्षण घेतले तर चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असते. या सगळ्या स्पर्धेत मिळणा-या गुणांना अतिश्य महत्व असते आणि यातूनच पालकांना खाजगी शिकवणी आवश्यक वाटू लागते.
खाजगी शिकवणीबाबत एक पालक म्हणाले, माझ्या मुलाला नामांकीत महाविद्याल्यात ११ वी विज्ञानला प्रवेश मिळाला. प्रवेशासाठी अर्ज, विनंत्या कराव्या लागल्या. सरते शेवटी झाले काय तर मुलाचा स्कोअर ३०० राहिला. ही परिस्थिती लक्षात घेता खाजगी शिकवणीकडे धाव घेण्याीची वेळ आली आणि त्याचा परिणाम असा झाला की, मुलाचा स्कोअर ब-यापैकी वाढला. नामांकीत महाविद्यालयात ९ हजार ५०० रुपये फिस भरुन प्रवेश घेतला. त्यानंतर महाविद्यालयाने ट्युशन फिस म्हणून ३५ हजार रुपये घेतले. मुलाची ११ वी व १२ वी होईपर्यंत ७० हजार रुपये ट्युशन फिस लागली. त्या तुलनेत खाजगी शिकवणीसाठी वर्षाला ५५ हजार रुपये भरावे लागले. विशेषत: जितकी टक्केवारी अधिक तितका फिसमध्ये डिस्काऊंट मिळतो. शिवाय एखादा विषय समजला नाही तर तो समजावुन सांगीतला जातो. या उलट महाविद्यालयांमध्ये डाऊट क्लिअर्न्स  केले जात नाहीत, पालकांशी कसलाही संपर्क ठेवला जात नाही. त्यामुळे महाविद्यालयांबाबत आपलेपणाची भावनाच निर्माण होत नाही. महाविद्यालयांच्या शिक्षणावर समाधानी नाही म्हणण्यापेक्षा महाविद्यालयात सीबीएसई पॅटर्नप्रमाणे शिकवलेच जात नाही.
आणखी एका पालकाने सांगीतले, महत प्रयासाने नामांकीत महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञानला मुलाला प्रवेश मिळाला. पण काही दिवसांतच मुलाने रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राविषयी प्राध्यापक कंसेप्ट क्लिअर करीत नसल्याचे सांगीतले. ही बाब माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. कारण मुलाच्या भवितव्याची चिंता होती. त्यामुळे तातडीने खाजगी शिकवणीचा मार्ग  अवलंबला.  आज मुलाच्या शैक्षणिक प्रगतीत खुप सुधारणा झालेली दिसून येत आहे. माझ्या दुस-या मुलाला सीए  फाऊंडेशन शिकतो म्हणुन एका नामांकीत महाविद्यालयाने फिस घेतली, पण तिथे या कोर्सची काहींच तयारी नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR