नवी दिल्ली : राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कच्या शिफारसीनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ एक नवा प्रयोग करुन पाहण्याच्या तयारीत आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओपन बुक टेस्ट’ राबवणार असल्याचे कळते. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
सीबीएसईने काही शाळांना ‘ओपन बुक टेस्ट’चा प्रयोग करुन पाहण्यास सांगितले आहे. यात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांसाठी तर ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि जीवशास्त्र या विषयांसाठी हा प्रयोग राबवला जाईल. यामधून काय फलित निघते आणि विद्यार्थ्यांना अशी परीक्षा देण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहिले जाणार आहे.
विशेष म्हणजे ‘सीबीएसई’ने यापूर्वी देखील असा प्रयोग केला आहे. २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओपन बुक टेस्ट’ परीक्षा राबवली होती. पण, यावर शैक्षणिक संस्था आणि शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे हा प्रयोग बासणात गुंडाळण्यात आला. पण, पुन्हा एकदा हा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘ओपन बुक टेस्ट’ पद्धतीच्या माध्यमातून काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर परीक्षा घेण्यात येतील. त्यानंतर ठरवले जाईल की, ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पद्धत राबवायची की नाही. सीबीएसईने यासाठी दिल्ली विद्यापीठाशी देखील बोलणी केल्याचे समजते.
‘ओपन बुक टेस्ट’ काय आहे?
‘ओपन बुक टेस्ट’ ही पारपंरिक परीक्षा पद्धत सोडून नवा प्रयोग आहे. यामध्ये उच्च कौशल्य आवश्यक असणारी परीक्षा घेतली जाते. परिक्षेतील प्रश्न अवघड असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरुन पुस्तके, स्टडी मटेरियल आणून परीक्षा देण्याची मुभा दिली जाते. यात घोकंपट्टी सोडून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला चालना मिळावी अशी अपेक्षा असते.