24 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeउद्योगब्रिटन भारताची चौथी मोठी निर्यात बाजारपेठ

ब्रिटन भारताची चौथी मोठी निर्यात बाजारपेठ

सहाव्यावरून चौथा क्रमांक, भारत-ब्रिटनमधील व्यापार वाढला, चीनला टाकले मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि ब्रिटन या दोन देशांमधील व्यापार वाढत आहे. मे महिन्यात चीनला मागे टाकत ब्रिटन भारताची चौथी मोठी निर्यात बाजारपेठ बनली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ब्रिटन भारताची सहाव्या क्रमांकाची निर्यात बाजारपेठ होती. सरकारी आकडेवारीवरून भारतातील प्रमुख १० निर्यात बाजारपेठेतील निर्यात मे महिन्यात वाढली. त्यात ब्रिटनमध्ये भारताची निर्यात वाढल्याने ब्रिटन निर्यात बाजारपेठेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भविष्याच्या दृष्टीने भारतासाठी हे शुभसंकेत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

वाणिज्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून मे महिन्यात भारतातून ब्रिटनमधील निर्यात जवळपास एक तृतीयांश वाढून १.३७ अब्ज डॉलर झाली आहे. चीनला झालेली निर्यात ही १.३३ अब्ज डॉलर राहिली. त्या महिन्यात विविध क्षेत्रांसाठी निर्यातीचे कोणतेही आकडे नव्हते. परंतु गेल्या काही महिन्यांचा कल दर्शवितो की, ब्रिटनमध्ये अधिक यंत्रसामग्री, अन्न उत्पादने, औषधे, कापड, दागिने, लोखंड आणि स्टीलची निर्यात झाली आहे. सरकारी आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतातील प्रमुख १० निर्यात बाजारपेठेतील निर्यात मे महिन्यात वाढली तरीही एक वर्षापेक्षा जास्त काळ निर्यातीत घट झाली आहे. मे महिन्यात देशातून निर्यात झालेल्या एकूण मालांपैकी ५२ टक्के माल १० देशांमध्ये गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात भारताची व्यापारी निर्यात ९.१३ टक्क्यांनी वाढून ३८ अब्ज डॉलर झाली आहे. जागतिक मागणीतील चढउतार आणि अर्थव्यवस्थांच्या वाढीतील मंदीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून निर्यातीत मंदी होती. मात्र, मे महिन्यात चांगली वाढ झाली. अमेरिकेतील निर्यात १३ टक्क्यांनी वाढली आणि भारताचा सर्वात मोठा निर्यात भागीदार राहिला. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील निर्यातीत १९ टक्के वाढ नोंदवली गेली. नेदरलँड भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यात भागीदार आहे. मे महिन्यात तेथील निर्यात ४४ टक्क्यांनी वाढून २.१९ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या महिन्यात भारतातून चीनला होणा-या निर्यातीत केवळ ३ टक्के वाढ झाली आहे. सौदी अरेबियाला ८.४६ टक्के, सिंगापूरला ४.६४ टक्के, बांगलादेशला १३.४७ टक्के, जर्मनीला ६.७४ टक्के आणि फ्रान्सला ३६.९४ टक्के निर्यात झाली आहे.

भारताची व्यापारी आयात ७.७ टक्क्यांनी वाढली
भारत ज्या १० देशांमधून सर्वाधिक आयात करतो, त्यापैकी केवळ २ देशांच्या आयातीत घट झाली आहे. मे महिन्यात सौदी अरेबियातून आयातीत ४.११ टक्के आणि स्वित्झर्लंडमधून आयातीत ३२.३३ टक्के घट झाली आहे. मे महिन्यात भारताची एकूण व्यापारी आयात ७.७ टक्क्यांनी वाढून ६१.९१ अब्ज डॉलर झाली आहे.

रशियाकडून होणा-या आयातीतही वाढ
रशियाकडून भारताची आयात १८ टक्क्यांनी वाढली आहे. ही आयात ७.१ अब्ज झाली आहे. ज्याचे प्रमुख कारण भारताचे तेलावरील अवलंबित्व आहे. चीननंतर भारत या देशातून सर्वाधिक आयात करतो. हा ट्रेंड मे महिन्यातही कायम राहिला. गेल्या महिन्यात चीनमधून आयात २.८१ टक्क्यांनी वाढून ८.४८ अब्ज डॉलर झाली. सोने प्रामुख्याने स्वित्झर्लंडमधून आयात केले जाते. मे महिन्यात तिथून भारतात होणारी आयात जवळपास एक तृतीयांश घसरून १.५२ अब्ज डॉलर झाली. मे महिन्यात अमेरिकेतून आयात ०.४ टक्के, यूएई १८ टक्के, इराक ५८.६८ टक्के, दक्षिण कोरिया १३ टक्के आणि सिंगापूर ८.७८ टक्क्यांनी वाढली. इंडोनेशियातील आयात २३.३६ टक्क्यांनी घटली. देशाच्या एकूण व्यापारी मालाच्या आयातीत या १० देशांचा वाटा सुमारे ६१ टक्के आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR