मुंबई (प्रतिनिधी) : तेलंगणातील बीआरएसचे सरकार केवळ सवंग प्रसिद्धीसाठी योजनांची अवास्तव प्रसिद्धी करीत होते. जाहिरातीत भलेही गुलाबी चित्र रंगवले गेले तरी वस्तुस्थिती काळीकुट्ट होती. कधी ना कधी खरे चित्र समोर येणारच होते आणि वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे झाले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
४ राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, बीआरएसने शेतक-यांना वर्षाला केवळ १० हजार रुपये देऊन इतर सर्व योजना जवळपास संपुष्टात आणल्या. तेलंगणात मोफत पीक कर्ज नव्हते, पीक विमा नव्हता, एमएसपीनुसार शेतमाल खरेदीसाठी यंत्रणा नव्हती, खासगी खरेदीदारांकडून शेतक-यांचे शोषण सुरू होते, त्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत होत्या. सिंचन प्रकल्पांवरील खर्च वाढवून भ्रष्टाचार सुरू होता. राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. सरकारी मंडळे, महामंडळे, शासकीय योजनांसाठीच नव्हे तर कर्मचा-यांना वेळेवर पगार द्यायलाही बीआरएसच्या राज्य सरकारकडे पैसा नव्हता. कर्ज काढून, सरकारी जमिनी विकून आणि अंदाधुंद पद्धतीने दारू दुकानांचे परवाने वाटून तेथील राज्य सरकार दिवस पुढे ढकलत होते. रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे पूर्ण कानाडोळा करण्यात आला होता त्यामुळेच तेलंगणाच्या मतदारांनी बीआरएसला नाकारून काँग्रेसला स्पष्ट बहुमताने निवडून दिले.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचे निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहेत. राजस्थानमध्ये अशोक गहलोत व छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चांगली कामे केली, चांगल्या योजना राबवल्या. दोघांचीही प्रतिमा उत्तम होती. या ३ राज्यांतील निकालांचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून विश्लेषण करून उणिवा शोधल्या जातील व दुरुस्तही केल्या जातील, असे अशोक चव्हाण यांनी या वेळी सांगितले.