तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारात शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा स्टिलच्या रॉडने निर्घृण खून करण्यात आला. ही घटना ५ मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये ३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सत्तार यासीन इनामदार (वय ५५, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) असे मयत शेतक-याचे नाव आहे. इनामदार हे ५ मार्च रोजी सायंकाळी आपल्या शेतातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने त्यांचा मुलगा सोहेल इनामदार त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला. यावेळी तिथे सत्तार इनामदार यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तो घाबरून गेला. सत्तार इनामदार यांच्या डोक्यावर स्टिलच्या रॉडने जबर मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना तातडीने तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मयत घोषित केले.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. यावेळी पोलिसांना सदर ठिकाणी दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकीट, सिगरेट, चिप्स पॉकेट आढळून आले. तसेच यामुळे या घटनेमागे नेमके कोणते कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. वसीम गफूर इनामदार (वय ३५, रा. सिंदफळ) यांच्या फिर्यादीवरून गणेश घाटशिळे आणि त्याच्या दोन साथीदारांविरूद्ध भारतीय दंड कलम १०३ (१) ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागे नेमके कोणते कारण आहे याचा तपास पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, खुनाच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.