26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeमहाराष्ट्रसोमवारी अर्थसंकल्प

सोमवारी अर्थसंकल्प

अजित पवार ठरणार शेषराव वानखेडेंनंतर अर्थसंकल्प सादर करणारे दुसरे नेते

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार सोमवार दि. १० मार्च रोजी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. शेषराव वानखेडेंनंतर अजित पवार सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक अजित पवारांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. २०२१ चा अर्थसंकल्प ८ मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. २०२२ चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी ११ मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता.

कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. मागील वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सर्वसमावेशक, क्रांतीकारी अर्थसंकल्प होता. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात त्या अर्थसंकल्पातील लोकोपयोगी, लोकप्रिय निर्णयांचा महत्वाचा वाटा होता. उद्या सादर होणा-या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा असून अजित पवार त्या अपेक्षांवर खरे उतरतील, हा विश्वासही जनतेच्या मनात आहे.

पवार सादर करणार विक्रमी अकरावा अर्थसंकल्प
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर ते शेषराव वानखेडे यांच्यानंतर (१३ वेळा) दुसरे सर्वाधिक (११) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील (१० वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (९ वेळा) यांना जातो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR