मुंबई : प्रतिनिधी
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीमध्ये निश्चित झाल्याप्रमाणे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज २६ मार्चपर्यंत चालणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले. त्यामुळे अधिवेशन शुक्रवार दि. २१ मार्च रोजी गुंडळण्यात येण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु असून २६ मार्चपर्यंत धिवेशनाचे कामकाज जाहीर करण्यात आले होते. मात्र गुरुवारी अधिवेशनाच्या कामकाजात अंतिम आठवडा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने अधिवेशनाचे कामकाज शुक्रवारी गुंडाळण्यात येईल, अशी जोरदार चर्चा विधानभवन परिसरात रंगली होती. त्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत राज्य सरकारने खुलासा करण्याची मागणी केली.
त्यावर सभागृहाचे कामकाज हे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पूर्ण केले जाणार आहे. अखेरच्या आठवड्यात संविधानावर चर्चा होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.