मुखेड : तालुक्यातील मौजे बिल्लाळी येथे गावातील नागरिक किशन दशरथ इंगळे यांच्या म्हशीला भटक्या कुत्र्यांनी काही दिवसांपूर्वी चावल्यामुळे ती अचानक आजारी पडली होती. कुत्रा चावल्याचे लक्षणे उशिरा दिसल्याने म्हशील वेळेत उपचार मिळाले नसल्यामुळे ५ ऑगस्ट रोजी म्हैस दगावली परंतु त्या म्हशीच्या मृत्यूपूर्वी तिचे दूध गावात अनेक ठिकाणी वितरित झाले होते.
या दुधाचे चहा व अन्य पदार्थांत वापर झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांने प्रत्यक्ष गावात जावून यासंदर्भात सर्वे केल्याने १९० जणांनी दूध पिल्याचे निष्पन्न झाले यापैकी १८२ नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथून ९८ लस, राजुरा बु.येथुन २५, बा-हाळी येथुन १९,देगलूर येथील रूग्णालयातुन १०, बिल्लाळी येथून ३० असे एकूण १८२ जणांना वेगवेगळ्या आरोग्य केंद्रातुन लस उपलब्ध करुन देऊन नागरिकांना देण्यात आली.आरोग्य विभागाचे पथक दोन दिवसांपासून बिल्लाळी येथे तळ ठोकून असून घरोघरी जाऊन सर्वे, तपासणी व लसीकरण सुरू केले आहे.
याकामी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रकांत दबडे, डॉ. बालाजी धनगे, डॉ. प्रणीता गव्हाणे, ए.एन.एम. जाधव, धुळगंडे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी काम पहात आहेत. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यासोबतच जनावरांना वेळोवेळी लस आणि उपचार मिळावेत, यासाठी ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय विभागाने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे.

