25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभा निवडणुकीचा बिगूल

लोकसभा निवडणुकीचा बिगूल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीचे अखेर आज बिगूल वाजले. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार देशात ७ टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार असून, पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी असणार आहे, तर १ जून रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान होईल. त्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. यासोबतच आंध्र, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या ४ राज्यांत विधानसभा आणि ४ राज्यांमधील २६ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकाही होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात ५ टप्प्यांत मतदान पार पडणार असून आजपासूनच आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली आहेत, असा दावा आयोगाने केला. देशात ९६.८ कोटीहून अधिक मतदार आहेत. देशात १० लाख ५० हजार मतदान केंद्र आहेत. जवळपास ५५ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम निवडणुकीच्या कामासाठी वापरले जाणार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १.५ कोटी कर्मचारी निवडणूक पार पाडण्याचे काम करत आहेत, असेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

निवडणुकीसंदर्भात ८०० जिल्हाधिका-यांशी चर्चा केली. निवडणूक निष्पक्ष आणि स्वतंत्र होणार आहे. आतापर्यंतच्या सर्व निवडणुका शांततेत पार पडल्या. मतदानाबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास वेबसाईटवर मिळू शकणार आहे. १.८२ कोटी नवीन मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. ८५ वर्षांवरील ८२ लाख मतदार, तृतीयपंथी ४८ हजार मतदार मतदान करतील. ४७.७ पुरुष आणि ४७.१ महिला मतदार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. १०० वर्षांवरील मतदार २ लाख आहेत. ८२ लाख मतदार हे ८५ पेक्षा जास्त वयाचे आहेत. १८ ते १९ वयातील १.८ कोटी तरुण मतदार आहेत. ८५ पेक्षा जास्त वयाच्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. हा प्रयोग आम्ही पहिल्यांदा करत आहोत, असेही ते म्हणाले.

दोनवेळा मतदान केल्यास कारवाई
एखाद्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याला ३ वेळा वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे. तसेच त्या पक्षाला त्याची माहिती द्यावी लागेल. मसल पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची मदत घेतली जात आहे. २ वेळा मतदान करणा-यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. हिंसाचारमुक्त निवडणूक राबवणे ही आमची जबाबदारी आहे. पैशांचा वापर निवडणुकीत होऊ देणार नाही, असे राजीव कुमार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR