26.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रखोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरवला

खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरवला

घर पाडले; वनविभागाची मोठी कारवाई

बीड : खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आले होते. त्यामुळे आता वनविभागाने ही कारवाई केली आहे. या आधी वनविभाने नोटिस पाठवली होती. पण ४८ तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खोख्या उर्फ सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे.

खोक्या भोसलेला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बीडमध्ये आणलं जात आहे. त्याचवेळी वनविभागाने त्याच्या घरावर कारवाई केली आहे. खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वनविभागाने धाड टाकली होती. त्यावेळी धारदार शस्त्रं, जाळी, वाघूरसह आणि अनेक गोष्टी वनविभागाला आढळून आल्या. प्राण्यांचे मांस देखील पोलिसांना आढळले. खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच, हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला.

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये मोठा हरणांचा कळप आहे, आणि या कळपाला संपवण्याचे काम सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या गँगने केले आहे. बावी गावातील ढाकणे यांच्या शेतीलगत असलेला डोंगर, या डोंगरांमध्ये हरण पाणी पिण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी येत होते. मात्र, त्याच हरणांना पकडण्यासाठी त्यांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळी लावत होती.

कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. आधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. वन्य प्राण्यांना मारणे, त्यांची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा आहे असं कोणी करत असेल तर शिकार करणा-या लोकांवरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR