धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील सराफा व्यवसायिकाच्या पत्नीने पतीसह सासरच्या लोकांकडून होणा-या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दि. २४ जून रोजी दुपारी धाराशिव शहरातील मुकूंद नगर येथे घडली. या प्रकरणी पती, सासू, सासरा, दिर, जाऊ, दिराची मुले, जावेचा चुलता यांच्यावर आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, धाराशिव शहरातील मुकूंद नगर येथे सानप कुटुंब राहते. मयत रंजना किरण सानप (वय २८ वर्षे) यांनी दि. २४ रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांना पती किरण बच्चाराम सानप, सासु सुनिता बच्चाराम सानप, सासरे बच्चाराम अग्णु सानप, दिर आण्णासाहेब बच्चाराम सानप, जाऊ सुलभा आण्णासाहेब सानप, त्यांची दोन मुले व सुलभाचा चुलता खाडे हे घराच्या बांधकामाचे देणे देण्यासाठी माहेरहुन पैसे घेवून ये, असे म्हणत शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन मानसिक व शारीरीक त्रास देत होते.
त्यांच्या त्रासास कंटाळून रंजना सानप यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी रंजनाचे वडील कानिफनाथ भास्कर घुगे रा. इंदापूर ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि. २४ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.सं कलम ३०६, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.