सोलापूर : शहरातील विविध भागात रात्रीच्यावेळी घरफोडी करणाऱ्यांच्या मुसक्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या. त्यांच्याकडून घरफोडीचे एकूण पाच गुन्हे उघड करून तीन लाख ९० हजार चारशे रुपये किमतीचे एकूण ९६ ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला आहे.
यात सिद्धू शामराव काळे (वय ३९, रा. मु. पो. चिंचोली एमआयडीसी, ता. मोहोळ), बजरंग नागनाथ चव्हाण (वय २९, रा. सनमडीकर हॉस्पिटल जवळ, जत, जि. सांगली), नरसिंह नागप्पा बल्लारी (वय ३१, रा. जत, जि. सांगली) व सचिन दामोदर सावंत (वय ३५, रा. जत, जि. सांगली, सध्या सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील पोशम्मा मंदिराजवळ,धनलक्ष्मी नगर, जुना विडी घरकुलसह सोलापूर येथील आजूबाजूच्या परिसरात चोरीच्या घटना वाढ झाली होती. यामुळे घरफोडीतील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पथक आणि सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिस चोरट्यांच्या मागावर होते.
चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी शहरातील विविध ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी त्यांच्या वाटणीस आलेली व खर्च करून शिल्लक राहिलेले ६२ हजार रुपये रोख जप्त केले आहे. आरोपी सोनार सचिन सावंत यांच्याकडून चार गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाख ९० हजार चारशे रुपये किमतीचे ९६ ग्रॅम दागिने जप्त केले आहेत.