28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रजळालेली डीपी तीन दिवसांत देणार बदलून

जळालेली डीपी तीन दिवसांत देणार बदलून

महावितरणची अनोखी मोहीम !

मुंबई : ट्रान्सफॉर्मर अर्थात रोहित्र (डीपी) जळाल्यास किंवा नादुरुस्त झाल्यास शहरासह ग्रामीण भागात मोठी गैरसोय होते. आता मात्र आवश्­यक त्या ठिकाणी नवीन रोहित्र देण्यात येणार आहे, सोबतच नादुरुस्त रोहित्राची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महावितरणने ही मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत असून जळालेल्या किंवा नादुरुस्त डीपीचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून ठिकाणाचा तपशील दिल्यास तो तीन दिवसांत बदलून किंवा दुरुस्त करून देण्यात येणार आहे.

डीपी जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणला होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे गैरसोय कायम राहते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नादुरुस्त रोहित्राबाबतची ही माहिती १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ या टोल फ्री क्रमांकावर व मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

गावातील डीपी जळाली तर वीज पुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांची विशेषत: शेतक-यांची मोठी अडचण होते. जळालेल्या डीपीच्या जागी दुरुस्त डीपी बसविण्यासाठी उशीर होतो. हा उशीर टाळण्यासाठी महावितरणकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करण्याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येत आहे.

यामुळेच मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात तो बदलण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मर जळाला आहे, याची माहिती उशिराने समजल्यामुळे प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीज ग्राहकांनी ट्रान्सफॉर्मर जळाल्याची माहिती महावितरणला देऊन मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

फोटो व ठिकाण पाठवा
महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच ग्राहकांना स्थानिक मंडलस्तरावरील संबंधित कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ७८७५७६२०१० या क्रमांकावरही माहिती देता येईल. व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर जळालेल्या किंवा नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा फोटो आणि ठिकाणाचा तपशील कळविता येईल. त्याची दखल घेऊन जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवून लवकरात लवकर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR