पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आहे. त्यातच आता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळील एका खाजगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की मुख्य महामार्गावरून ही बस जवळपास २५ फूट खाली कोसळली. सध्या इंदापूर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर एका खासगी प्रवाशी बसचा अपघात झाला. ही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी इंदापूरपासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर या बसचे दोन्हीही टायर फुटले. यामुळे लोखंड वाहतूक करणा-या एका ट्रॅकला या बसने धडक दिली. त्यानंतर ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास २५ ते ३० फूट खाली कोसळली.
सोलापूर जिल्ह्याातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. तर इंदापूरपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेला मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता. यावेळी बसचे टायर फुटल्याने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकमध्ये असलेले लोखंड रस्त्यावर पडले होते. तर अपघातग्रस्त बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून थेट २५ फूट रोडच्या बाहेर जाऊन पडली.
या बस मध्ये नेमकी किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र या बसमधील १० ते ११ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.