वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर ज्यादा शुल्क लादण्याची घोषणा केल्यापासून जागतिक बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण आहे. अमेरिकेसह अनेक देशांचे शेअर बाजार कोसळले आहेत. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर बाजाराबाबत एक नवीन पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमधून डोनाल्ड ट्रम्प यांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
ट्रम्प टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारपेठेत खळबळ उडाली असून गेल्या चार दिवसांत अमेरिकन बाजारपेठेत ६ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त घसरण झाली आहे. एवढेच नाही तर ट्रम्प टॅरिफमुळे गेल्या सोमवारी भारतीय शेअर बाजारही सुमारे ४००० अंकांनी घसरला. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लिहितात की, शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी हा एक उत्तम वेळ आहे.
जागतिक बाजारपेठेत मंदीच्या भीतीमुळे बुधवारी ट्रम्प यांनी अचानक बहुतांश देशांवर लादलेले शुल्क ९० दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प म्हणाले की हे देश अधिक अनुकूल अटींवर वाटाघाटी करण्यास तयार आहेत. या बातमीनंतर काही मिनिटांतच शेअर बाजार तेजीत आला. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आणि सेन्सेक्स-निफ्टीमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली असे असूनही भारतासह जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये शेअर बाजाराबाबत भीतीचे वातावरण आहे.