सोनीपत : हरियाणामधील सोनीपतच्या गन्नौरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे, तिकिट कापल्याच्या बातमीने नाराज झालेले भाजप नेते देवेंद्र कादियान यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. भारतीय कुस्तीगीर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र कादियान यांनी फेसबुक लाईव्ह करून पार्टीचा निरोप घेतला आणि भाजपमध्ये तिकिटांची खरेदी-विक्री सुरू आहे, असा गंभीर आरोप कादियान यांनी केला. कादियान यांच्या आरोपामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
दरम्यान आता कादियान यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गणौरच्या धान्य मार्केटमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले. या जाहीर सभेनंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या घडामोडीमुळे गणौरच्या राजकारणात खळबळ उडाली असून भाजपसाठी हे मोठे नुकसान मानले जात आहे.
हरियाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सातत्याने धक्के बसत आहेत. अनेक नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली असून, उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी सत्ताधारी भाजपवर नाराज असून, विधानसभा निवडणुकीत भाजपला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.