मुंबई : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले हे साता-यामधून तर केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडून गेल्याने राज्यसभेच्या २ जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी येत्या ३ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या २ जागांसह एकूण १२ जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील दोन्ही जागा महायुतीला मिळू शकतील. यातील एक जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी छगन भुजबळ आणि नितीन पाटील इच्छुक आहेत.
निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार १४ ऑगस्ट २०२४ रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २२ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल तर २६ ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येईल. त्यानंतर ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. महायुतीत राज्यसभेच्या २ जागांपैकी भाजपा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढविणार आहे. राज्यसभेच्या २ जागा निवडून आणण्याइतके संख्याबळ महायुतीकडे आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
निती पाटील की, छगन भुजबळ?
राष्ट्रवादीकडून सातारा जिल्ह्यातील नेते नितीन पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांनी पाटील यांचे नाव जाहीर केले होते. मात्र लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने छगन भुजबळ हेही या जागेसाठी इच्छुक असणार आहेत तर भाजपाकडून विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आहे.