मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पक्ष कंबर कसणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून पंकजा यांच्या पुनर्वसनासाठी प्लॅन आखण्यात आल्याची माहिती आहे. भाजप पंकजा मुंडे यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवल्यास त्यांना राज्यात मंत्रीपद मिळण्याचीदेखील शक्यता आहे.
पंकजा मुंडे या भाजपच्या माजी आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री होत्या. तसेच त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधननंतर पंकजा या महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त सक्रिय झाल्या. पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ओबीसी समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाची मते आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.