नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने सीएए अर्थात नागरीकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता सीएए कायदा देशभरात लागू होणार आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वीच संसदेच्या दोन्ही सभागृहात सीएएचा कायदा मंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारकडून सीएए कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने सीएए कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतचे संकेत दिले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्याआधी सीएए कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मोदी आपल्या संबोधनातून काय बोलणार? याबाबत देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.