मुंबई : प्रतिनिधी
दि. १६ तारखेला नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होणारू असून तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी यश दिल्याने सरकारवर चांगल्या कारभाराचे दडपण आहे. लोकांच्या विश्वासाला आम्ही पात्र राहू, असा विश्वास व्यक्त करताना निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेस सर्व कल्याणकारी योजना भविष्यातही सुरू राहतील अशी ग्वाही देताना, राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन काही गोष्टी कराव्या लागतील, असे संकेत त्यांनी दिले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रालयात आले व पदभार स्वीकारला. यानंतर प्रथेप्रमाणे पत्रकार कक्षाला भेट देऊन संवाद साधला. आपण बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करणार असून विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांचा आवाज दडपला जाणार नाही. त्यांचा आवाज महत्वाचा असेल. मागच्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासाने गती घेतली ती गती थांबणार नाही, शिंदे आणि माझे रोल जरी बदलले असले तरी एकदिलाने काम करत राहू. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सहमतीने निर्णय घेऊ. पूर्वीच्या मंत्र्यांच्या कारभाराचा आढावा घेऊन त्यांना संधी दिली जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहिण योजना पुढेही सुरू राहणार असून, मानधन २१०० रुपये करण्याबाबत अर्थासंकलपात निर्णय घेतला जाईल. अन्य कल्याणकारी योजना सुरू ठेवूनच पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय आम्ही घेतला होता व हे आरक्षण कायम राहील यासाठी आवश्यक ते सर्व केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ७, ८, व ९ डिसेंबरला विधानसभा विशेष अधिवेशन आहे. ९ तारखेला विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यपालांना पत्र देण्यात येईल. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण झाली आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
एकनाथ शिंदे यांची नाराजी नव्हती. त्यांच्याशी मी चर्चा केली होती. त्यांना मी विनंती केली आणि ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाले. परंतु नाराजीच्या बातम्या चालल्या. आमच्यात चांगले समन्वय होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.