23.8 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्रिमंडळ बैठकीला शिंदे पुन्हा अनुपस्थित

मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे पुन्हा अनुपस्थित

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. याशिवाय नगरविकास आणि पाणी पुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मंत्री-अधिका-यांच्या बैठकीला दांडी

सोशल वॉररुमची विशेष बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांशी निगडित चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी निमंत्रण असूनही त्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. शिंदेंच्या गैरहजेरीमागील नेमकं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी नगरविकास आणि पाणी पुरवठा मंत्रालयाची आढावा बैठक बोलावली होती, मात्र तीही रद्द करण्यात आली. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीला आभासी उपस्थिती
विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष अनुपस्थिती होती. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच या बैठकीला हजेरी लावली होती. खातेवाटप, पालकमंत्रिपद आणि अधिकार यावरुन शिवसेना मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच एकनाथ शिंदे अजूनही नाराज असल्याची चर्चा वाढल्या आहेत. नाराज असताना शिंदे दरे गाव गाठत असल्याचं समीकरण आणि गेल्या काळातील शिंदेंचे वाढते गावचे दौरे यावरुन त्यांच्या नाराजीची चर्चा रंगत आहे.

कोणत्या कारणांमुळे नाराजीची चर्चा
याआधी महायुती सरकार स्थापन होण्याआधी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत चर्चांना उधाण आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला होता. त्यानंतर महायुतीत पालकमंत्रिपद वाटपाबाबतही दुजाभाव झाल्याची भावना काही शिवसैनिकांनी बोलून दाखवली होती. रायगडमध्ये तर मोठा वाद उफाळून आलेला पाहायला मिळाला. तिथे शिवसैनिकांनी जाहीरपणे भूमिका मांडली. या सगळ्या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR