पुणे : येरवडा भागातील एका कॉलसेंटरमध्ये काम करणा-या तरुणीवर सहका-याने कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला रात्री उशीरा अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने तरुणीवर आर्थिक वादातून हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.
आरोपीने केलेल्या हल्ल्यात २८ वर्षीय तरुणी जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तरुणी पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहायला आहे. ती येरवड्यातील एका प्रसिद्ध कॉलसेंटरमध्ये कामाल आहे. याप्रकरणी हल्लेखोर कृष्णा सत्यनारायण कनोज (वय ३०, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर) याला येरवडा पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली. तरुणीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मूळची सातारची आहे. आरोपी कृष्णा आणि तरुणी कॉलसेंटरमध्ये कामाला आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारात तरुणी काम संपवून वाहनतळावर आली. त्यावेळी तेथे थांबलेल्या कृष्णाने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने तरुणीवर कोयत्याने वार केले. आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने तरुणीवर आर्थिक वादातून हल्ला केल्याची माहिती मिळाली. मात्र, हल्ल्यामागचे निश्चित कारण काय आहे यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.