जालना : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट उद्देशून म्हटले की, हैदराबाद गॅझेटनुसार तातडीने प्रमाणपत्र वाटप सुरू करा. तुम्ही मराठ्यांची मने जिंकली आहेत, ती कायम ठेवायची असतील तर वेळ घालवू नका.
यावेळी जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांना उद्देशून ते म्हणाले, सरकारमधील लोकं हैदराबाद गॅझेट विरोधात कोर्टात जात आहेत, हे कसे चालतंय? छगन भुजबळांनी गॅझेटविरोधात पाच याचिका दाखल केल्या, हे तुमच्या परवानगीशिवाय शक्य आहे का?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचे सांगत जरांगे म्हणाले, फडणवीस साहेब, लोकांनी तुमच्यावर मोकळ्या मनाने प्रेम केले आहे. तुम्ही मोठ्या मनाने जीआर काढला, पण भुजबळ त्याला विरोध करताहेत. तुमच्या बळाशिवाय ते असे करुच शकत नाहीत.
जरांगे यांनी स्पष्ट मागणी केली की, भुजबळांचा जमीन रद्द करुन त्यांना मंत्रिमंडळात बाहेरचा रस्ता दाखवा. तसेच, येत्या कॅबिनेट बैठकीत सातारा संस्थांचे गॅझेट काढा. आता आमच्यात थांबायची क्षमता नाही. सरकारने विलंब केला, तर आम्ही पुन्हा निर्णायक आंदोलन छेडू. मराठा समाजाची सहनशीलता आता संपत आली आहे असेही जरांगे पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.

