सोलापूर – काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी आमदार, पदाधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुपारी १२ वाजता रॅलीला सुरुवात झाली. जिल्हा न्यायालय, सिव्हिल चौक, लष्कर मार्गे ही रॅली सात रस्ता चौकात आली. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा केलेले लोक लक्ष वेधून घेत होते. श्रीराम, सीता, लक्ष्णम आणि हनुमानाची वेशभूषा करूनही काही कलावंत सहभागी झाले होते. काँग्रेस भवनाजवळ जाहीर सभा झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ही निवडणूक इतर निवडणुकांसारखी नाही.
ही निवडणूक लोकशाही वाचविण्यासाठी आहे. भाजपचे मागचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले. आज निवडणुकीत एकही खासदार प्रचारात दिसत नाही. लोक त्यांना प्रश्न विचारतील म्हणून ते घाबरून येत नाहीत. आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
देशात सरकारविरुध्द लाट : पटोले
देशात आता मोदी सरकारच्या विरोधात लाट आहे. भाजपचे नेते घाबरले आहेत. ते विरोधकांना बदनाम करण्याचा कट करीत आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.