22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रउमेदवाराला ईव्हीएमची मायक्रोचीप तपासता येणार

उमेदवाराला ईव्हीएमची मायक्रोचीप तपासता येणार

पहिल्यांदाच सुविधा, ५ टक्क्यांची मर्यादा, तपासणीसाठी ४० हजार भरावे लागणार

मुंबई : प्रतिनिधी
देशाच्या निवडणूक इतिहासात पराभूत झालेल्या उमेदवारांना काही शंका असल्यास प्रथमच ईव्हीएम मशिनमधील मायक्रोचीप तपासण्याचे अधिकार मिळाले आहेत. निकालात काही शंका असल्यास संबंधित मतदारसंघातील एकूण ५ टक्के ईव्हीएमच्या मायक्रोचीप तपासता येणार आहेत. पण त्यासाठी प्रत्येक ईव्हीएममध्ये ४० हजार रुपये भरावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाच्या इंजिनियरसमोरच ही मायक्रोचीप तपासली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने नुकतीच सर्व जिल्हाधिका-यांना या संदर्भातील गाईडलाईन्स पाठवली आहे. त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत दुस-या आणि तिस-या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना मतमोजणी संपल्याच्या ७ दिवसांच्या आत त्यांना शंका असलेल्या बूथच्या ईव्हीएममधील मायक्रोचीप तपासण्यासाठी अर्ज करता येणार आहे. हा अर्ज निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल आणि त्यास मंजुरी मिळाल्यास निवडणूक आयोगाकडून पाठवलेल्या अभियंत्यांच्यासमोर दुस-या आणि तिस-या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना शंका असलेल्या आणि अर्ज केलेल्या बूथवरील ईव्हीएमची मायक्रोचीप तपासता येणार आहे. जेणेकरून मतदान नेमके कोणाला आणि कसे पडले, त्यामध्ये काही बोगस मतदान झाले नाही ना, याचा तपास करता येणार आहे. अर्थात, मायक्रोचीपच्या माध्यमातून ५ टक्के मतदान तपासल्यानंतर या गोष्टी लक्षात येण्यास मदत होणार आहे. यावेळी प्रथमच ही संधी दिल्याने याचा कितपत फायदा होतो, ते याबाबत एखाद्या उमेदवाराने आक्षेप घेतल्यानंतरच समोर येईल.

देशातील ५४२ आणि राज्यातील ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवार, दि. ४ जून रोजी लागणार आहे. नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान होणार का की इंडिया आघाडी बाजी मारून सत्ता स्थापन करणार, याचा निकाल उद्या लागणार आहे. मतमोजणीदरम्यान ब-याच गोष्टी समोर येणार आहेत. मतमोजणी सुरू असताना जर एखाद्या उमेदवाराला मतदानाविषयी शंका असेल, तर उमेदवार त्यासंदर्भात आपले आक्षेप नोंदवू शकतात आणि मायक्रोचीपच्या माध्यमातून ते ५ टक्के मतमोजणी करू शकणार आहेत.

तपासणीसाठी मोठी किंमत मोजावी लागणार
मायक्रोचीप तपासायची असेल तर उमेदवारांना मोठी रक्कमही खर्च करावी लागणार आहे. प्रत्येक ईव्हीएम आणि त्याच्या मायक्रोचीपच्या तपासणीसाठी उमेदवाराला ४० हजार रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच एखाद्या उमेदवाराने १० मशीनमधील मायक्रोचीप तपासण्याचा अर्ज केला असल्यास आणि त्याचा अर्ज मंजूर झाला तर त्याला चार लाख रुपये भरावे लागतील.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR