पुणे : प्रतिनिधी
मी निवडून येईन का? माझ्या निवडीला वातावरण अनुकूल आहे का? मी जिंकलो तरी मला मंत्रिपद मिळेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी उमेदवारांची पावले हळूहळू ज्योतिषांकडे वळू लागली आहेत. लढत अधिक चुरशीची होणार असल्याने आपण निवडून येऊ का? याची चिंता उमेदवारांना भेडसावू लागली आहे.
सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य बुधवारी (दि. २०) मतपेटीमध्ये बंद होणार आहे. मतदारांचा कौल नक्की कुणाकडे आहे, याबाबतचा अंदाज सध्यातरी कुणालाच बांधता येत नाही, अशी स्थिती आहे. शेवटच्या दोन दिवसांत चित्र पालटू शकते, अशी एकंदर स्थिती आहे. त्यामुळे माझ्या ग्रहांची दिशा निवडणूक जिंकण्यास अनुकूल आहे का नाही? हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांच्या ज्योतिषांकडे चकरा सुरू झाल्या आहेत. अगदी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून तिकिट वाटप झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह, प्रचार कधी सुरू करायचा यासाठी ज्योतिषांचे सल्ले घेतले जात आहेत.
नेत्यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत येणा-या अडचणी किंवा यशाबद्दल अंदाज हवा असतो. त्यासाठी कुंडलीचा अभ्यास केला जातो. ब-याच नेत्यांना वाईट नजर, शत्रुत्व किंवा राजकीय अडथळ्यांपासून बचावासाठी ज्योतिषांकडून रत्न, यंत्र, मंत्र किंवा हवन करण्याचा सल्ला दिला जातो. लोकांना नेत्यांची ‘धार्मिक आणि आध्यात्मिक’ बाजू दाखवण्याचा हा एक मार्ग असतो. यातून त्या नेत्यांबद्दल लोकांमध्ये श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतो. राजकारणात नव्याने पदार्पण करणारे नेते अनेकदा ज्योतिषांचा सल्ला घेऊनच राजकारणात आपली पावले टाकत आहेत.