13.2 C
Latur
Wednesday, November 19, 2025
Homeमनोरंजनप्रसिद्ध दिग्दर्शक राजामौलींवर गुन्हा दाखल

प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौलींवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली हे अडचणीत सापडले आहेत. राजामौली यांनी भगवान हनुमानाबाबत एक विधान केले होते, यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी राजामौली यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती, त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने हा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान हनुमानांबद्दल वादग्रस्त विधान
वाराणसी चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यावर प्रेक्षकांना संबोधित करताना राजामौली म्हणाले की मी देवावर विश्वास ठेवत नाही. माझ्या वडिलांनी सांगितले की देव हनुमान सर्व गोष्टी सांभाळून घेतील. मला विचार करून खूप राग आला की अशा पद्धतीने गोष्टी सांभाळत आहेत का? माझी पत्नी हनुमानाची खूप मोठी भक्त आहे. ती अशा प्रकारे वागते, जणू ते तिचे मित्रच आहेत आणि ती त्यांच्याशी संवाद साधते. मला तिच्यावरही राग आला. जेव्हा माझ्या वडिलांनी हनुमानाविषयी सांगितले आणि यशासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला, तेव्हाही मला खूप राग आला.

सोशल मीडियावर टीका
या कार्यक्रमानंतर राजामौली यांचे हे विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले असून त्यांच्यावर सडकून टीका झाली आहे. लोकांनी या विधानाला धार्मिक भावनांचा अपमान आणि भगवान हनुमानाच्या श्रद्धेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्यांना सुनावले आहे.

हिंदू सेनेकडून त्वरित कारवाईची मागणी
राजामौली यांच्या या विधानाची दखल घेत हिंदू सेनेने तक्रार दाखल केली होती. विष्णू गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की भगवान हनुमानाबद्दल केलेल्या विधानामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत. या विधानामुळे सामाजिक आणि सामुदायिक सौहार्द बिघडू शकते. त्यामुळे असा लोकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात यावेत. त्यानंतर आता राजामौली यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR