ठाणे : प्रतिनिधी
नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहणा-या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचं समर्थन करणे भोवले आहे. त्यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती.
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोमवारी विधिमंडळ परिसरात केले. या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवली, असा खळबळजनक दावादेखील आझमी यांनी केला. आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाचं कौतुक करत आपल्या अकलेचे तारे तोडले. वादग्रस्त विधान करणा-या अबू आझमींविरोधात ठाण्यात शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे पोलिस ठाण्यात आझमी यांच्या विरोधात सोमवारी घोषणाबाजी करण्यात आली. अबू आझमींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली आहे.
उबाठा पक्षाने हिंमत हरलेली आहे. त्यांच्याकडे आंदोलन करायलासुद्धा माणसं नाहीत. त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार आणि हिंदुत्वाचे तत्त्व इंदिरा गांधी यांच्या घरात गहाण ठेवले आहे. त्यांना प्रथम राहुल गांधी आणि सोनिया गांधींची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर ते आंदोलनात उतरतील असे म्हस्के म्हणाले.