गोंदिया : येथील रेल्वे स्थानकावर एक प्रवासी बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत वावरताना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या आढळला. रेल्वे स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचा-यांनी त्याची चौकशी करुन त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात ८ लाख १० हजार व त्याच्या खिशात दीड लाख रोख असे एकूण ९ लाख ६० हजार रुपये आढळले. संबंधित व्यक्तीने पैशाची योग्य माहिती व पुरावे न दिल्याने ती जप्त करुन हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे स्टेशन व्यवस्थापक यांच्या कार्यालयासमोर एक व्यक्ती बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एक बॅग घेऊन संशयस्पद स्थितीत वावरताना आढळला. रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचा-यांनी त्याची चौकशी करुन त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात ८ लाख १० हजार रुपये रोख, त्याच्या खिशात दीड लाख रुपये रोख असे एकूण ९ लाख ६० हजार रुपये आढळले.
याबाबत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला विचारणा केली असता त्यांनी आपले नाव राकेश गोकुलदास आहुजा(५१) रा. मालवीय वॉर्ड रामचंद्र आइल मिलजवळ श्रीनगर असे सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचा-यांनी त्याच्याजवळ आढळलेल्या रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच या रोख रक्कमे संदर्भात त्याच्याकडे कुठलेच कागदपत्रे नव्हती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचारी आणि साक्षदारांच्या उपस्थितीत इन कॅमेरा आरोपीचे बयान नोंदवून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला देऊन हे प्रकरण त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
हवालाची रक्कम असल्याचा संशय
संबंधित आरोपीकडे आढळलेल्या ९ लाख ६० हजार रुपयांच्या रकमेसंदर्भात कुठलेच पुरावे दिले नाही तसेच कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे ही रक्कम हवालासाठी तर जात नव्हती असा संशय व्यक्त केला जात आहे.