32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeराष्ट्रीयनिवडणुकीत पंजाब नेहमीच केंद्रा विरोधात

निवडणुकीत पंजाब नेहमीच केंद्रा विरोधात

चंदिगढ : पंजाबमध्ये सर्व १३ लोकसभा मतदारसंघांसाठीचे मतदान सातव्या टप्प्यामध्ये १ जून रोजी पार पडणार आहे. मात्र, मागील सहा लोकसभा निवडणुकांची आकडेवारी काढली असता, पंजाबने आजवर केंद्रातील सत्तेच्या विरोधात जातच मतदान केले असल्याचे लक्षात येते. याला फक्त १९९८ व २००९ च्या निवडणुकीचा अपवाद आहे. २०१४ साली आम आदमी पार्टी हा पक्ष पंजाबमध्ये आपले पाय रोवण्यासाठी प्रयत्न करीत होता; तेव्हाच आप पक्षाचे चार खासदार पंजाबमधून निवडून संसदेत गेले होते. त्यामुळेच आज पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्तेत आहे. २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने ११७ पैकी ९२ जागा जिंकत सत्ता काबीज केली.

१९९८ साली पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल व भाजपा यांची सत्ता होती. १९९६ साली या दोन्ही पक्षांनी युती केली होती आणि त्यापुढील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आले होते. त्यांनी एकत्रितपणे ९५ जागांवर विजय मिळविला होता. १९९८ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंजाबने केंद्रातील सत्तेबरोबर जाणे पसंत केले. शिरोमणी अकाली दल आणि भाजपाच्या युतीला १३ पैकी ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये घवघवीत यश मिळाले. त्यापैकी तीन जागा भाजपाच्या होत्या.

१९९८ च्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील १८२ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. इतर मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवत अटलबिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे सुपुत्र सुखबीरसिंग यांनी या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. फरीदकोट मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर वाजयेपी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले होते.
१९९९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र एनडीए सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपाला पुन्हा एकदा १८२ जागा मिळाल्या. वाजपेयी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पहिल्यांदा पूर्ण केला. मात्र, पंजाबमध्ये एनडीए आघाडीची वाताहत झाली. शिरोमणी अकाली दल आणि भाजपाच्या युतीने एकत्रितपणे फक्त तीन जागा जिंकल्या. विशेष म्हणजे त्यावेळी राज्यात त्यांचेच सरकार होते. १९९८ साली काँग्रेसला पंजाबमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, १९९९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने आठ जागा जिंकल्या.

भाजपाला २००४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याविषयी खूपच मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास होता. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी सहा महिने आधीच लोकसभा बरखास्त केली आणि निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारने मनमोहन सिंग यांच्या डोक्यावर पंतप्रधानपदाचा मुकुट चढवीत, सत्ता स्थापन केली. मात्र, या निवडणुकीतही पंजाबमधील निकाल केंद्रातील सत्तेला अनुकूल ठरणारे नव्हते. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या; तर शिरोमणी अकाली दल (८) व भाजपाने (३) अशा एकत्रितपणे ११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी पंजाबमध्ये कॅप्टन अम्रिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता होती.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २००९ ची लोकसभा निवडणूक पुन्हा जिंकली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या. बसपा, जेडीएस व राजद यांच्या पाठिंब्यासह यूपीए सरकारने सत्ता स्थापन केली. त्यावेळी पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली शिरोमणी अकाली दलाची सत्ता होती. तरीही काँग्रेसला पंजाबमध्ये आठच जागा मिळविता आल्या. पंतप्रधानपदी असणारा शीख व्यक्तीचा चेहरा काँग्रेसच्या पथ्यावर पडला. या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला चार; तर भाजपाला फक्त एकच जागा मिळाली.

२०१४ ची लोकसभा निवडणूक
या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने एकहाती सत्ता प्राप्त केली. २८२ मतदारसंघांमध्ये विजय मिळवीत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काँग्रेसने या निवडणुकीत फक्त ४४ जागा जिंकल्या. पंजाबमध्ये २०१२ साली शिरोमणी अकाली दल आणि भाजपाने सत्ता स्थापन केली होती. मात्र, या निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने बाजी मारली होती.

२०१९ ची लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये भाजपाने प्रचंड बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन केली. एकट्या भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पंजाबमध्ये केवळ आठ जागा जिंकू शकला; तर शिरोमणी अकाली दलाने १० जागा लढवून दोनच जागा जिंकल्या. भाजपाने तीन जागा लढवून दोन जागा जिंकल्या. या निवडणुकीत ‘आप’लाही फारसे यश मिळाले नाही. फक्त भगवंत मान यांनाच विजय मिळविता आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR