छ. संभाजीनगर : मित्रासोबत पळून गेलेल्या अल्वयीन चुलत बहिणीला समजावण्याच्या बहाण्याने डोंगरावर फिरायला नेऊन तिला दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ६) तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडला. अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला. नम्रता गणेशराव शेरकर (१७ वर्षे, रा. शहागड, श्रीराम कॉलनी, ता. अंबड, जि. जालना) असे तिचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश तान्हाजी शेरकर (वय, २५ रा. वळदगाव) याला अटक केली आहे. नम्रताचे एका आंतरजातीय तरुणावर प्रेम होते. दोघेही लग्न करणार होते. यातून आपल्या कुटुंबाची मानहानी होईल, या विचारातून चुलत भावाने केलेल्या कृत्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नमृताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. काही दिवसांपूर्वी ती घर सोडून गेली होती. कुटुंबीयांनी समजूत काढून तिला पुन्हा घरी आणले. यानंतर नम्रताला वळदगाव येथे राहणा-या चुलत्याकडे राहण्यास पाठवण्यात आले. सोमवारी (दि. ७) बाहेरून जाऊन येऊ, असे म्हणत चुलत भाऊ ऋषिकेश हा नमृताला खवड्या डोंगरावर घेऊन गेला. याठिकाणी तिच्यासोबत गप्पा मारता-मारता ऋषिकेश याने नम्रताला डोंगरावरून खाली ढकलून दिले. सुमारे २०० फुटांवरून खाली पडल्याने नम्रताचा जागीच मृत्यू झाला.
क्रिकेट सामन्याच्या लाईव्ह प्रेक्षपणामुळे आरोपी कॅमे-यात कैद
ही धक्कादायक घटना तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडली. डोंगराखाली क्रिकेटची मॅच सुरू होती. यावेळी क्रिकेटचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत होते. त्यामुळे आरोपी ऋषिकेश हा डोंगरावरून खाली उतरत असतानाचे लाईव्ह प्रेक्षपणावेळी कॅमे-यात कैद झाले. पोलिसांनी संशयित आरोपी ऋषिकेश शेरकर यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नम्रताचा चुलतभाऊ ऋषिकेश ऊर्फ वैभव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात मारामा-या करणे, प्राणघातक हल्ले करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये तो हर्सूल जेलची हवा खाऊन आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.