शिमला : सीबीआयच्या पथकाने एका मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या सहाय्यक संचालकाच्या घरी धाड टाकली. यावेळी पथकाला घरात रोख रक्कम आणि इतर वस्तू आढळून आल्या. सीबीआयने धाडीत १ कोटी आणि १४ रुपये जप्त केले. दरम्यान, धाड पडण्याआधीच ईडीचा अधिकारी फरार झाला. सीबीआयने या अधिका-याच्या भावाला अटक केली असून, तो बँकर आहे.
ईडीचे शिमला येथील सहाय्यक संचालकावर लाच घेतल्याचा आरोप आहे. एका मनी लाँडरिंग प्रकरणात या अधिका-याने लाच घेतल्याचा आरोप आहेत. याचा तपास आता सीबीआय करत आहे. एका सीबीआय अधिका-याच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
सीबीआय अधिका-याने सांगितले की, रविवारी (२२ डिसेंबर) ईडी अधिका-याच्या घरी धाड टाकण्यात आली. यावेळी घरात ५६ लाख रुपये रोख रक्कम सापडली. रोख रकमेसह एक कारही जप्त करण्यात आली. या धाडीनंतर आरोपी फरार झाला. या प्रकरणात त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे.
सीबीआयने अधिका-याच्या शिमला येथील राणी व्हिला या घराची आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. यावेळी घरात ५६ लाख ५० रुपये सापडले. या प्रकरणात आतापर्यंत १.१४ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
भावाला सीबीआय कोठडी?
ईडी अधिका-यावर भ्रष्टाचार निर्मूलन कायदा १९८८ मधील कलम ७ अ अन्वये सीबीआयच्या चंदीगढ येथील कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ईडी अधिका-याच्या भावाला अटक केल्यानंत चंदीगड येथील विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिका-याचा भाऊ दिल्लीत बँकेत मॅनेजर आहे. ईडी अधिकारी ज्या एजंटच्या मार्फत लाच घ्यायचा, तो एजंटही फरार आहे. सीबीआय त्याचा शोध घेत आहे.