नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याच्या आरोपावरून आणखी ४९ खासदारांना निलंबित केले. त्यामुळे या अधिवेशनात एकूण निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली. ही आतापर्यंतची सर्वाधिक निलंबनाची संख्या आहे. दरम्यान, काँग्रेस संसदीय पक्षाची बुधवारी बैठकीत झाली. या बैठकीत काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी निलंबनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, संसदेत उचित आणि योग्य मागण्या मांडणाऱ्या खासदारांवर अशी कारवाई करून केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे.
सोनिया गांधी यांनी बुधवारी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले की, याआधी कधीच इतक्या विरोधी खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले नव्हते. विरोधी खासदारांनी १३ डिसेंबरच्या “असामान्य घटने”बद्दल गृहमंत्र्यांकडून केवळ निवेदन मागितले होते, जेंव्हा दोन घुसखोर लोकसभेच्या चेंबरमध्ये घुसले रंगीत धूर उडवला. पण खासदारांच्या विनंतीचा ज्या उद्धटपणाने विचार केला गेला त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत, असे त्या म्हणाल्या.
याआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी खासदारांच्या निलंबनावर म्हटले होते की, मोदी-शहा यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेचा अपमान केला आहे. सुरक्षेतील गंभीर त्रुटी असूनही ते संसदेत येऊन कोणतेही वक्तव्य करत नाहीत. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या खासदारांना निलंबित करण्यात आल्याचे मला खूप वाईट वाटते. हे लोकशाहीचा अवमान करण्यासारखे आहे आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेचा घोर अपमान आहे.