19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeसोलापूरसाथरोगांच्या प्रादुर्भावाबाबत दक्षता घेण्याच्या सीईओच्या सूचना

साथरोगांच्या प्रादुर्भावाबाबत दक्षता घेण्याच्या सीईओच्या सूचना

सोलापूर : नागरिकांना निर्जंतुक व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या ग्रामपंचायतीच्या मूलभूत कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशुद्ध पाणीपुरवठा करणान्या गावांना जोखीमग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात यावे, तसेच जोखीमग्रस्त गावांची यादी जिल्हास्तरावर देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी दिली.

पावसाळयात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये दूषित पाणी वाहून आल्याने ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे पाणीपुरवठा ,सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतो किवा नाही, याची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करणे, डास व माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छताविषयक उपाययोजना करणे, पाणी शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ३३ टक्के क्लोरीन असलेली ब्लिचिंग पावडर, सोडियम हायपोक्लोराइड, तुरटी यांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा. ज्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा साठा नाही अथवा कमी आहे, तेथे ब्लिचिंग पावडरचा तत्काळ पुरवठा करण्यात यावा.पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन्सची तपासणी करून, त्यांना गळत्या असल्यास त्या काढणे व त्या पाइपलाइन्स गटारातून अथवा गलिच्छ पाण्यातून जाणार नाहीत,याची दक्षता घेण्यात यावी.

योजनांच्या माध्यमातून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर योग्य शुध्दीकरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असते. ग्रामीण भागात पाण्याचे नियमित शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण न करता पाणीपुरवठा होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी. असे सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सांगीतले. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता दर तीन महिन्यांतून एक वेळा करावी; तसेच दूषित पाणीपुरवठ्यामुळे निर्माणा होणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती करण्यात यावी, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितले आहे.जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांना सीईओ मनीषा आव्हाळे यांनी लेखी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये पावसाचे पाणी मिसळल्याने साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता असते. पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही साथीचा उद्रेक होऊ नये, याबाबत आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR