छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक चौक उड्डान पुलाजवळ एन-४ सिडको या ठिकाणी एच.पी. कंपनीचे गँस टँकरला अपघात झाला आहे. या गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असून, सदर गॅस हवेमध्ये पसरलेला असून, अजूनही पसरत आहे. या अपघात स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात. तसेच लोक जमा होत आहेत. सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेता या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.
शहरातील सिडको एन-३, एन-४, एन-५ परिसरातील सर्व शाळा व आस्थपना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उप जिल्हादंडधिकारी जर्नाधन विधाते यांनी निर्गमित केले आहे. सदरील आदेश दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळ पासून ते गॅस गळतीची घटना पूर्णत: नियंत्रणात येईल त्या कालावधी पर्यंत अंमलात राहिल. नागरिकांनी सुरक्षेचा दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.
औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज बंद…
ज्या भागात हा अपघात झाला आहेत त्यापासून औरंगाबाद खंडपीठ जवळच आहे. विशेष म्हणजे खंडपीठात रोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच, खंडपीठात येणा-या नागरिकांना जालना रोडमार्गे यावे लागते. दरम्यान, हा मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे, आज औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहेत.