सोलापूर:हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी उध्दारू, जाणता राजा श्रीमंत छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्यावतीने भव्य दिव्य असा पाळणा महोत्सव ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीने साजरा केला झाला आहे. या सोहळ्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील सुमारे २५ हजाराहून अधिक माता बहिणी उपस्थित राहिल्या होत्या. पाळणा गीत गाऊन झाल्यानंतर नभांगनात आकर्षक अशी आतिषबाजी करण्यात आली. सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव हा जयघोष करण्यात आला. या पाळणा महोत्सवासाठी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती लाभली होती.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा भव्यदिव्य पाळणा महोत्सव मोठ्या थाटामाटात आणि शिवकालीन पद्धतीने पारंपारिक वेशभूषेत साजरा झाला. शहर जिल्ह्यातील प्रत्येक माऊली या पाळण्या महोत्सवासाठी आतुरतेने दाखल झाले होते. यासाठी पुतळ्या समोर स्टेज तयार करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला झेंडूच्या फुलांच्या आकर्षक आरास करण्यात आली होती.
मंगलमय वातावरणात हा सोहळा हजारो महिलांनी याची देही याची डोळा अनुभवला. या महोत्सवास शहीद माता, शहीद पत्नी, व शहीद कन्या यांची विशेष उपस्थिती लाभली. या शहीद पत्नींच्या हस्ते पाळण्याची दोर देऊन पाळणा महोत्सव रात्री ठीक बारा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तदनंतर दिमाखात आतिशबाजीउत्सव करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही पाळणा महोत्सवासाठी अनेक माता भगिनी आतुर झालेल्या दिसून आल्या. पारंपारिक शिवकालीन वेशभूषामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेषतः महिलांची लक्षणीय संख्या लक्ष घेता महिला पोलिसांचा बंदोबस्त येथे लावण्यात आला होता.