30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरही भाजपकडेच?

छ. संभाजीनगरही भाजपकडेच?

मराठवाड्यात शिंदेसेनेला फक्त एकच जागा भाजपची मोठी खेळी!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही जागावाटपाचे गु-हाळ चालूच आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांत अनेक जागांवरून वाद सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरही अद्याप ठोस तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, मराठवाड्यात मोठी ताकद असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येथे फारशा जागा मिळण्याची शक्यता नाही. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छ. संभाजीनगरची जागादेखील भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत. मात्र या आठपैकी साधारण सहा जागांवर भाजपाचे उमेदवार असतील. म्हणजेच ताकद असूनही शिंदे यांच्या शिवसेनेला येथे कमी जागा मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी संभाजीनगरात येऊन मोठी सभा घेतली होती. म्हणजेच अमित शहांच्या सभेच्या रूपात भाजपने येथे चांगले शक्तिप्रदर्शन करत या जागेवर दावा सांगायला चालू केले होते. आता या जागेसाठी भाजपकडून शिंदे यांच्या शिवसेनेवर दबाव टाकला जात आहे. आम्ही केलेल्या सर्वेक्षणात ही जागा आमच्यासाठी अनुकूल आहे, असे भाजपकडून सांगितले जात आहे.

आठपैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर
भाजपने याआधीच बीड, जालना, नांदेड, लातूर या जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. म्हणजेच मराठवाड्यातील आठ पैकी चार जागांवर तर भाजपचे उमेदवार असणार हे स्पष्ट झालेले आहे.

हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जागांसाठीही भाजपकडून जोर लावला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे शिवसेना ही जागा सोडायला तयार नाही. धाराशिव आणि परभणी या जागादेखील आम्हालाच मिळाव्यात अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे हिंगोली, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जागांबाबत महायुतीत नेमका काय तोडगा निघणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

१ खासदार, १० आमदारांची ताकद
दरम्यान, मराठवाड्यात शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी ताकद आहे. येथे शिवसेनेचा एक खासदार आणि तब्बल १० आमदार आहेत. तरीदेखील शिवसेनेला मराठवाड्यात समाधानकारक जागा मिळण्याची चिन्हे नाहीत. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. भाजपचा उमेदवार असेल की शिवसेनेचा असा विचार करण्यापेक्षा, हा विषय प्रतिष्ठेचा करण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला जागा देण्यात येणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR