नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणा-या धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटर यझुवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. सुमारे ५ वर्षांपूर्वी या दोघांनी लग्न केले होते, जे आता तुटण्याच्या मार्गावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट निश्चित झाला आहे, ज्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. यासोबतच न्यायालयाने यावर अंतिम सुनावणीसाठी तारीखही निश्चित केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून यझुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मात्र, दोघांनीही अद्याप या प्रकरणावर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता एका वृत्तानुसार मुंबई उच्च न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाची पुष्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी कौटुंबिक न्यायालयाला आदेश दिले आहेत की आगामी आयपीएल सुरू होण्यापूर्वी २० मार्च रोजी चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी घेऊन निर्णय घ्या. अशा प्रकारे उद्या गुरुवारी दोघांच्या लग्नाबाबत मोठा निर्णय येणार आहे.
तथापि, काही दिवसांपूर्वी धनश्री वर्माच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर चहलसोबतचे जुने फोटो पुन्हा दिसल्याची माहिती समोर आली होती. पण त्यात किती तथ्य आहे, याबाबत अधिकृतपणे काहीही कळू शकले नाही. यझुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी २०२० च्या डिसेंबरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते, तेव्हा ५ वर्षांनंतर त्यांचे नाते तुटेल, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.
मिळालेल्या वृत्तानुसार, यझुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या लग्नाच्या २ वर्षांनंतर त्यांच्यात मतभेद सुरू झाले होते आणि हे जोडपे गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत आहे.