जळगाव : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय सहकारी, संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्यासमोरील अडचणी विधानसभेच्या तोंडावर वाढण्याची शक्यता आहे. कारण जामनेरचे भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप खोडपे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.
लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रावादीची तुतारी फुंकून ते गिरीश महाजन यांच्याविरोधात तगडे आव्हान उभे करतील, असे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. युती आघाड्यांच्या राजकारणात राज्यातली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेल्याने इच्छुकांना पक्षनेतृत्वाची मनधरणी करण्यावाचून पर्याय नाही. प्रयत्न करूनही ज्यांना तिकीट मिळण्याची शाश्वती नाही, त्यांनी झाले गेले विसरून पक्ष बदलण्याची तयारी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा २१ तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या यात्रेदरम्यान भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती मिळत आहे. खोडपे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश करून खोडपे हे विधानसभेला गिरीश महाजन यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करतील. राष्ट्रवादीतर्फे त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचीही माहिती कळते आहे. पक्षप्रवेश सोहळ्यावेळी त्यासंदर्भातील संकेत दिले जातील.
दिलीप खोडपे हे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. एकेकाळी मंत्री गिरीश महाजन यांचे खोडपे अतिशय निकटवर्तीय सहकारी मानले जायचे. गेली अनेक वर्षे विधानसभेच्या राजकीय महत्त्वकांक्षा असूनही खोडपे यांना संधी मिळत नव्हती. शरद पवार यांनी हीच गोष्ट हेरून खोडपे यांना पक्षात घेण्याचा विचार केला.
विधानसभा निवडणूक लागायला अगदी काहीच आठवड्यांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरून उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याआधी इच्छुक आपली उमेदवारी अंतिम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.