रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री यांनी भाजपात जाण्याची घोषणा केली आहे. यानंतर सोरेन यांनी दिल्लीवारीही केली होती. यावेळी सोरेन यांच्या विमानात दोन गुप्तहेरही होते, असा दावा भाजपाने केला आहे. चंपई सोरेन यांच्या विमानातून दोन जणांना अटक करण्यात आल्याच्या दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केला आहे.
आसामचे मुख्यमंत्री व झारखंडचे भाजपा सह प्रभारी शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. चंपई सोरेन यांचा कोलकाता पासून पाठलाग केला जात होता. सोरेन यांचा फोनही ट्रेस केला जात असल्याचा संशय शर्मा यांनी व्यक्त केला.झारखंडचे माजी मुख्यमंत्री असलेल्या सोरेन यांनी हेमंत सोरेन तुरुंगात असताना राज्याची धुरा सांभाळली होती. परंतू, पक्षातून बाजुला टाकले जात असल्याचा आरोप करत ते भाजपात जाणार असल्याचे वृत्त येत होते. अखेर मंगळवारी त्यांनी बांगलादेशी झारखंडची भूमी बळकावत असून झामुमो मतांसाठी काहीच करत नसल्याचा आरोप करत या प्रश्नावर भाजपा एकमेव गंभीर असल्याचे म्हटले होते. तसेच यामुळे आपण भाजपात जात असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
चंपई सोरेन यांनी दिल्लीत पोहोचल्यावर झारखंड पोलिसांच्या दोन सब इन्स्पेक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. हे दोघे हेरगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. झारखंड पोलिसांच्या स्पेशल ब्रँचचे दोन पोलिस अधिकारी सोरेन आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाठलाग करत होते, असा आरोप करण्यात आला आहे.
दोन्ही पोलिस सोरेन यांच्यासोबत विमानातून कोलकाताहून दिल्लीला पोहोचले, सोरेन उतरलेल्या ताज हॉटेलमध्येच त्यांनी रुम बुक केला होता. दोघेही सोरेन यांचा फोटो काढत होते. या दोघांना पकडून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चौकशीत हे दोघेही झारखंड पोलिस असल्याचे समोर आले आहे. झारखंडच्या एडीजीपींनी त्यांना हे काम दिले होते, असेही त्यांनी चौकशीत सांगितल्याचे शर्मा म्हणाले.