नागपूर : राज्यासह देशभरात गारठा वाढत आहे. दिवसा आणि रात्री गुलाबी थंडी आहे. मात्र असे असतानाही दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यासह देशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात काही भागांत जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज सहा नोव्हेंबरला मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने नागरिकांना सुरक्षितेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर दरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.