परभणी : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दि.६ ते ९ एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वा-यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा इशारा वनामकृविच्या हवामान विभागाने दिला आहे.
दि.७ रोजी छत्रपती संभाजी नगर, लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तर दि.८ रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर व परभणी जिल्हयात तर दि.९ रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह वा-याचा वेग ताशी ३० ते ४० कि.मी. राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दि.७ रोजी नांदेड व ८ रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. दि.६ रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी रात्रीच्या वेळी उष्णता जाणवेल, अशी माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ.कैलास डाखोरे यांनी दिली आहे.