33 C
Latur
Monday, June 2, 2025
Homeउद्योगआर्थिक सेवा नियमांत १ जूनपासून होणार बदल

आर्थिक सेवा नियमांत १ जूनपासून होणार बदल

सामान्यांच्या खिशावर होणार परीणाम कुठे फायदा तर कुठे तोटा

नवी दिल्ली : जून महिना तुमच्या बजेटसाठी अनेक प्रकारे महत्त्वाचा ठरू शकतो. १ जूनपासून अनेक आर्थिक आणि वापरकर्ता-सेवेशी संबंधित नियम बदलणार आहेत. यामध्ये बँक एफडी, क्रेडिट कार्ड, एलपीजी गॅस, पीएफ काढणे, एटीएम आणि म्युच्युअल फंडमध्ये आधार अपडेट करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे.

जूनपासून कोटक महिंद्रा बँक आणि इतर बँकांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल होतील. रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते, ऑटो-डेबिट फेल्युअरसाठी दंड कमी केला जाऊ शकतो आणि इंधन/युटिलिटी पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. सेबीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनांसाठी नवीन कट-ऑफ वेळ लागू केली आहे.

१ जूनपासून ऑफलाइन व्यवहारांसाठी दुपारी ३ वाजता आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी संध्याकाळी ७ वाजता वेळ असेल. त्यानंतर केलेल्या ऑर्डरचा विचार पुढील कामकाजाच्या दिवशी केला जाईल. एनपीसीआयने एक नवीन नियम लागू केला आहे ज्या अंतर्गत यूपीआय पेमेंट करताना वापरकर्त्याला फक्त अल्टीमेट बेनिफिशियरी म्हणजेच ख-या प्राप्तकर्त्याचे बँकिंग नाव दिसेल.

क्युआर कोड किंवा संपादित नावे यापुढे दिसणार नाहीत. हे नियम ३० जूनपर्यंत सर्व यूपीआय अ‍ॅप्सना लागू करावे लागतील. काही बँकांनी असे सूचित केले आहे की जूनपासून, क्रेडिट कार्डद्वारे वीज, पाणी यांसारखी युटिलिटी बिल भरण्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते किंवा कॅशबॅकच्या अटी बदलल्या जाऊ शकतात.

ईपीएफओ ३.० लाँच होणार
ईपीएफओ १ जूनपासून ईपीएफओ ३.० ची नवीन आवृत्ती लाँच करत आहे. यासह, पीएफ काढणे, केवायसी अपडेट आणि क्लेम प्रक्रिया पूर्वीपेक्षा जलद आणि सोपी होईल. विशेष म्हणजे एटीएम कार्डप्रमाणे ईपीएफशी संबंधित कार्ड देखील वापरता येतील.

एफडी व्याजदरात बदल
जूनमध्ये बँका मुदत ठेवी आणि कर्जाचे व्याजदर बदलू शकतात. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याची शक्यता असल्याने एफडी दर कमी होऊ शकतात. उदाहरणार्थ, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ५ वर्षांच्या एफडीवरील व्याजदर ८.६ % वरून ८% पर्यंत कमी केला आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतील
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. १ जून रोजी, घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात, ज्याचा थेट तुमच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर परिणाम होईल.

एटीएम व्यवहार शुल्क वाढण्याची शक्यता
जूनपासून एटीएममधून मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर आकारण्यात येणारा शुल्क वाढू शकतो. जे लोक वारंवार पैसे काढतात त्यांच्या खिशावर या बदलाचा परिणाम जाणवेल.

मोफत आधार अपडेटसाठी अंतिम मुदत
आधार कार्डची मोफत अपडेट सुविधा फक्त १४ जूनपर्यंत आहे. त्यानंतर ऑनलाइन अपडेटसाठी २५ रुपये आणि केंद्रावर ५० रूपये शुल्क आकारले जाईल. म्हणून ओळख आणि पत्ता पुरावा लवकर अपडेट करावे लागणार.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR