छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे समितीकडून कुणबी नोंदी शोधल्या जात असून, या समितीचा दुसरा अहवाल देखील सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाच मराठा आरक्षणासाठी न्यायालयात बाजू मांडलेल्या डॉ. बाळासाहेब सराटे यांनी केलेल्या नवीन आरोपाने खळबळ उडाली आहे. तर, मराठवाड्यातील मराठा समाजाची फसवणूक होत असून, ९५ टक्के मराठे आरक्षणाच्या बाहेर राहणार असल्याचा दावा सराटे यांनी केला आहे.
याबाबत सराटे यांनी म्हटले आहे की, न्या. शिंदे समितीने ५४.८१ लाख नोंदी शोधल्याचे सरकारने जाहीर केले. पण, त्यात सगळेच मराठा कुणबी नाहीत. त्यात कोकणातील व विदर्भातील कुणबी यांच्या नोंदी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या नोंदी सर्वांना आधीच माहीत होत्या आणि ते आरक्षण घेतात. त्या वेगळ्या जाती आहेत. त्यांचा मराठा समाजाशी संबंध नाही. विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी यापूर्वी कुणबी दाखले घेतले अशा मराठ्यांचाही यात समावेश आहे. तर, ज्या मराठा कुणबी समाजाला कुणबी दाखले मिळत नव्हते, अशा पूर्वी माहीत नसलेल्या व नव्याने प्राप्त झालेल्या नोंदी किती, याचा नेमका आकडा सरकार सांगत नसल्याचे सराटे म्हणाले.
ऑक्टोबर १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदी नाहीत ही समस्या प्रामुख्याने मराठवाड्यातील आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदींचा आकडा अत्यल्प आहे. त्यामुळे केवळ ५ टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळणार असून, मराठवाड्यातील सुमारे ९५ टक्के मराठा समाज पुन्हा आरक्षणाबाहेर राहण्याची शक्यता आहे. सरकार या ५४.८१ लाख नोंदी डिजीटाईज करून सर्वांसाठी खुल्या करणार आहे. याने मराठवाड्यातील मराठ्यांचा प्रश्न सुटणार नाही.
सरकार यानंतर उर्वरित मराठा समाजाला ५० टक्क्यांवरील आरक्षण देण्याच्या तयारीत आहे. म्हणजे ज्यांच्यावर शेकडो वर्षे अन्याय झाला त्या मराठवाड्यातील मराठ्यांच्या नशिबी पुन्हा ५० टक्क्यांवरील आरक्षण येणार आहे. जे टिकणार नाही, त्याचे लाभ मिळणार नाहीत. ते आरक्षण केवळ राज्यापुरते राहील. अशी पुन्हा एकदा मराठवाड्यातील मराठा कुणब्यांची घोर फसवणूक होणार आहे, हे लक्षात घ्यावे, असे बाळासाहेब सराटे म्हणाले आहेत.