32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeक्रीडाचेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर दमदार विजय

चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर दमदार विजय

धर्मशाला : तीन प्रमुख गोलंदाजांच्या गैरजहेरीतही चेन्नई सुपर किंग्सने १६७ धावांचा यशस्वी बचाव करून दाखवला. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने बाजी मारून गुणतालिकेत १२ गुणांसह तिस-या क्रमांकावर झेप घेतली. पण, या पराभवाने पंजाबची वाटचाल प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर जाण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. रवींद्र जडेजा आज अष्टपैलू कामगिरी करून चमकला. तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात दोन धक्के देऊन सामना सेट केला आणि १८ महिन्यानंतर पुनरागमन करणा-या सिमरजीत सिंगने जबरदस्त गोलंदाजी केली.

तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टो ( ९) आणि रायली रुसो ( ०) यांचे त्रिफळे उडवले. पण, शशांक सिंग व प्रभसिमरन सिंग यांनी तिस-या विकेटसाठी ३६ चेंडूंत ५३ धावा जोडून पंजाबला सावरले. मिचेल सँटनरने ही जोडी तोडली आणि शशांक २७ धावांवर बाद झाला. पुढच्या षटकात रवींद्र जडेजाने पंजाबचा आणखी एक सेट फलंदाज माघारी पाठवला. प्रभसिमरन ३० धावांवर झेलबाद झाला आणि पंजाबला ६८ धावांवर चौथा धक्का बसला. १८ महिन्यानंतर मैदानावर परतलेल्या सिमरजीत सिंगने पहिल्याच षटकात जितेश शर्माला ( ०) धोनीकरवी झेलबाद केले. धोनीचा हा आयपीएलमधील १५० वा झेल ठरला.

५ बाद ६९ वरून पंजाबला सावरण्याची जबाबदारी कर्णधार सॅम करनवर होती. १२ व्या षटकात मोईन अलीला पंजाबच्या कॅप्टनला जीवदान दिले, परंतु त्याचा फार उपयोग झाला नाही. रवींद्र जडेजाने पुढच्या षटकात करनला ( ७) मोठा फटका खेचून झेल देण्यास भाग पाडले. एका चेंडूच्या फरकाना जडेजाने पंजाबच्या आशुतोष शर्माला ( ३) माघारी पाठवले आणि त्यांची अवस्था ७ बाद ७८ अशी केली. जडेजाने ४ षटकांत २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने ६, ४ खेचून सिमरजीतवर दडपण आणले, परंतु त्याने चतुराईने संथ चेंडू टाकून त्याला फसवले. हर्षल १२ धावांवर झेलबाद झाला.

राहुल चहर व हरप्रीत ब्रार यांचा संघर्ष १८व्या षटकात शार्दूल ठाकूरने मोडला. चहर १६ धावांवर बाद झाला. पंजाबदला ९ बाद १३९ धावाच करता आल्या आणि हा चेन्नईचा १११५ दिवसानंतर पंजाबवरील पहिला विजय ठरला. मागील ५ सामन्यांत पंजाबने बाजी मारली होती. या विजयासह चेन्नई तिस-या क्रमांकावर आले. तत्पूर्वी, चेन्नईच्या फलंदाजीचा भार ऋतुराज गायकवाड ( ३२) , डॅरिल मिचेल ( ३०) व रवींद्र जडेजा ( ४३) यांनी उचलला. गायकवाड व डॅरिल मिचेल यांनी ५७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने १७ धावा केल्या, पण महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. चेन्नईला ९ बाद १६७ धावाच करता आल्या. हर्षल पटेल ( ३-२४) व राहुल चहर ( ३-२३) यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले, तर अर्शदीप सिंगने दोन व सॅम करनने एक विकेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR