चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील तिस-या सामन्यात मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने मात केली आहे. चेन्नईने यासह या हंगामाची विजयाने सुरुवात केली आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या १५६ धावांचे आव्हान चेन्नईने ६ विकेट्स गमावून १९.१ ओव्हरमध्ये पूर्ण केले. चेन्नईने १५८ धावा केल्या. रचीन रवींद्र याने सिक्स ठोकत चेन्नईला विजयी केले. मुंबई संघाने सलग १३ व्या हंगामात पहिला सामना गमावला आहे. संघाने शेवटचा सामना २०१२ मध्ये राजस्थानविरुद्ध जिंकला होता.
सीएसकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने चेन्नईला १५६ धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १५५ धावा केल्या. चेन्नईने १५६ धावांचे लक्ष्य १९.१ षटकात ६ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड (५३ धावा) आणि रचिन रवींद्र (नाबाद ६५) यांनी अर्धशतके झळकावली. रवींद्र जडेजाने १७ धावांचे योगदान दिले.
मुंबईकडून पदार्पण करणा-या विघ्नेश पुथूरने ३ विकेट्स घेतल्या. दीपक चहर आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तत्पूर्वी, मुंबईने २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. तिलक वर्माने ३१, कर्णधार सूर्यकुमार यादवने २९ आणि दीपक चहरने नाबाद २८ धावा केल्या. नूर अहमदने ४, तर खलील अहमदने ३ विकेट घेतल्या.