21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeक्रीडाचेतेश्वर पुजारा सोलापुरात खेळणार

चेतेश्वर पुजारा सोलापुरात खेळणार

महाराष्ट्र - सौराष्ट्र सामना शुक्रवारपासून सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर

 

सोलापूर : चेतेश्वर पुजारा शुक्रवारपासून येथे रणजी करंडक स्पर्धेतील सामना खेळताना दिसणार आहे. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र सामना सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला जात आहे.

३६ वर्षीय पुजाराने १०३ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्याच्या नावावर ७,१९५ धावा आहेत. पुजाराच्या नावावर १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.

नागपूर येथे झालेल्या विदर्भविरुद्धच्या लढतीत पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा विक्रम करणारा पुजारा केवळ चौथा भारतीय खेळाडू आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या मांदियाळीत पुजाराने स्थान पटकावले आहे. पुजाराने त्या सामन्यात ४३ आणि ६६ धावांची खेळी केली होती. सौराष्ट्रने त्या लढतीत विजय मिळवला होता.

या लढतीच्या निमित्ताने सोलापुरकरांना पुजारा, उनाडकत या खेळाडूंच्या बरोबरीने शेल्डॉन जॅक्सन, धर्मेंद्रसिंग जडेजा, चिराग जाणी, प्रेरक मंकड, अर्पित वसावदा या सातत्याने चांगली कामगिरी करणा-या खेळाडूंचा खेळ पाहता येणार आहे. महाराष्ट्राच्या संघासाठी हे घरचे मैदान असणार आहे. महेंद्रसिंग धोनीचा लाडका शिलेदार केदार जाधवकडे महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व आहे. केदारची फटकेबाजी पाहण्यासाठी सोलापुरकर उत्सुक आहेत. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खो-याने धावा करणारा अंकित बावणे या सामन्याचे आकर्षण असणार आहे.

सौराष्ट्रचा यंदाच्या हंगामातला सलामीचा झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णित झाला होता. हरयाणाविरुद्ध त्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाचा वचपा सौराष्ट्रने विदर्भविरुद्ध घेतला. या लढतीत त्यांनी २३८ धावांनी विजय मिळवला. सर्व्हिसेसविरुद्धचा सामना अनिर्णित झाला. सोलापुरात त्यांचा सामना तुल्यबळ महाराष्ट्राशी होणार आहे.

महाराष्ट्राने मणिपूरविरुद्ध एक डाव आणि ६९ धावांनी विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णित झाला. राजस्थानविरुद्ध महाराष्ट्राला पराभवाला सामोरे जावे लागले. हरयाणाविरुद्धची लढतही अनिर्णित झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR