22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeसोलापूरपत्नीचा गळा आवळून खून

पत्नीचा गळा आवळून खून

सोलापूर : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत चाललं आहे. सोलापुरात याचदरम्यान, एक भयंकर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.वीस वर्ष दोघांनी संसार केला. दोन लेकरं झाली. मात्र, आर्थिक चणचण भासत होती. संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसे कमी पडत होते. यामुळे पती पत्नीत सतत भांडणे होत होती. पैशांसाठी जावई सतत सासू – सासऱ्यांकडे पत्नी मार्फत तगादा लावत होता. अखेर चिडलेल्या पतीने थंड डोक्याने पत्नीचा इलेक्ट्रीक वायरने गळा आवळून खून केला. सोलापूर शहराजवळ असलेल्या यत्नाळ गावात ही घटना घडली आहे. यत्नाळ गाव हे होटगी गावाजवळ आहे. दुपारी खून करुन पती दिवसभर गावात फिरला.

अखेर पती एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर झाला. एमआयडीसी पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी आरोपीला कुंभारी गावाजवळ असलेल्या विडी घरकुल चौकीत पाठवले. घरकुल पोलिसांनी वळसंग पोलिसांच्या स्वाधीन केले. शरणबसप्पा महादेव हिरोळे (वय ४० वर्ष, रा.यत्नाळ, दक्षिण सोलापूर) असं आरोपीचं नाव आहे. रेखा शरणबसप्पा हिरोळे (वय ३४) असं मृत पत्नीचं नाव आहे. रात्री दीडच्या सुमारास वळसंग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.

रेखा आणि शरण बसप्पा यांचा विवाह २० वर्षांपूर्वी झाला होता. रेखा आणि शरणबसप्पा या दाम्पत्यास दोन लेकरं देखील झाली होती. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक चणचण भासत होती .त्यामुळे पती पत्नीत सतत भांडण होत होती, मारहाण होत होती. सासू सासरे सोलापुरातील दिंडोरे गावात राहत होते. मृत रेखा हीचा भाऊ ओमान या देशात नोकरीला आहे. सासू सासरे नेहमी पाच ते दहा हजार रुपयांची मदत रेखा आणि शरणबसप्पा यांना करत होते. मेहुणा ओमान देशातून बहिणीला आर्थिक मदत करत होता. शरणबसप्पा हा रोजंदारीवर मजुरीचे काम करत होता. त्यामुळे पतीपत्नीत पैशांच्या कारणावरून सतत कुरबुर होत होती. शरणबसप्पा आणि रेखा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते.

शरणबसप्पा हा बुधवारी सकाळीच सात वर्षांच्या मुलीला बहिणीकडे सोडून आला. दुपारी पुन्हा रेखा आणि शरणबसप्पा यांच्यात जोरदार भांडण झाले. शरणबसप्पा याने रेखा हीचा इलेक्ट्रीक वायरने गळा आवळला. सुटका होऊ नये यासाठी वायरला पिळा मारल्या. २० वर्षांपासून संसार केलेल्या पत्नीने तडफडत प्राण सोडले. बुधवारी दुपारीच रेखाचा मृत्यू झाला होता. पत्नीला संपवल्यानंतर शरणबसप्पा याने मृतदेहावर चादर घातली आणि घरातील पंखा फास्ट लावला. बाहेरून कडी लावून गावभर फिरला.

संध्याकाळी स्वतःहून सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली दिली. एमआयडीसी पोलिसांनी हद्द पाहून विडी घरकुल चौकी कुंभारी गावाकडे पाठवून दिले. त्यानंतर वळसंग पोलिसांनी आरोपी नवऱ्याला शरणबसप्पा याला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली. रात्री नऊ वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला व रेखाच्या आई वडिलांना घटनेची माहिती दिली. २० वर्ष संसार केलेल्या पत्नीचा शेवट अशा प्रकारे झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR